केज दि.२३ – घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी एका शाळेवरील सेवकाच्या घराचे कुलूप तोडून दागिने आणि संसारोपयोगी साहित्य असा ३४ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना केज शहरातील शिक्षक कॉलनी भागात घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरालगतच्या शिक्षक कॉलनी भागात वास्तव्यास असलेले नामदेव नरहारी आघाव हे त्याच परिसरात असलेल्या प्रा. विश्वनाथराव कराड विद्यालयात सेवक पदावर नोकरी करतात. त्यांचे कुटुंब हे २२ सप्टेंबर रोजी घराला कुलूप लावून गावाकडे गेले होते. मध्यरात्री घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घराची झडती घेत ३० हजार रुपये किंमतीचे १० ग्रामचे मणीमंगळसुत्र, तीन हजार रुपये किंमतीचे एक गॅस सिलेंडर व शेगडी, एक हजार पाचशे रुपये किंमतीचे पितळी भांडे, घागर व पितळी पातीले असा ३४ हजार पाचशे रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता नामदेव आघाव हे गावाकडून परत घरी आले असता घरी चोरीचे झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, शिक्षक कॉलनी भागात घरफोडी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.