केज दि.24 – चिंचोली माळी आणि युसुफवडगाव सर्कल मधील गावांना कोरोना नियमांचे पालन, तोंडावर मास्क न लावणाऱ्या व सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती कोरोना दक्षता समितीचे पथक प्रमुख गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनी दिली.
केज तालुक्यतील चिंचोली माळी आणि युसूफ वडगाव जिल्हा परिषद गटातील गावात कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन आणि कार्यवाही यावर देखरेख करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गठीत केले आहे. या पथकात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती तरकसे, केंद्रप्रमुख श्री.अंकुशे व गिरी हे आहेत. या पथकाने साळेगाव, चिंचोली माळी, सातेफळ, मांगवडगाव व युसुफवडगाव येथे भेटी दिल्या. भेटी दरम्यान त्यांनी हॉटेल्स, टपऱ्या, किराणा दुकान, सलून व विविध व्यावसायिक यांना भेटून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी तोंडावर मास्क वापरणे बंधनकारक असून न वापरल्यास ५०० रु. दंड सक्तीने वसूल केला जाणार आहे. तर व्यवसायाच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळून सोशल डिस्टनसिंग आवश्यक आहे. नियमांचे उल्लंनघन करणाऱ्या विरुद्ध एक हजार रु. दंडाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली. या पथकाने सरपंच कैलास जाधव व ग्रामसेवक दत्तात्रय गव्हाणे यांची भेट घेऊन कार्यवाही संदर्भात सूचना व मार्गदर्शन केले.
या वेळी पथका सोबत केंद्रीय मुख्याध्यापक सुरेश काळे, अर्जुन बोराडे, सातेफळचे सरपंच बापूराव घाडगे व पत्रकार गौतम बचुटे हे होते.
दरम्यान “नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व आपला बचाव करण्यासाठी सर्व साथरोग प्रतिबंधक उपाययोजना व नियमांचे पालन करावे अन्यथा दंड केला जाईल अशा सक्त सूचना सुनिल केंद्रे यांनी केल्या.