Site icon सक्रिय न्यूज

कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेचा गळा आवळून खून 

केज दि.३० – शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय महिलेचा अज्ञातांनी गळा आवळून आणि कपाळावर मारून निर्घृणपणे खून केल्याची घटना केज तालुक्यातील साळेगाव शिवारात शुक्रवारी ( ता. ३० ) सकाळी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळी मृतदेह विवस्त्र अवस्थेत पडला होता. केज पोलिसात अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 
        साळेगाव येथील आश्विनी समाधान इंगळे ( वय २४ ) ही महिला शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास स्वतःच्या दस्तगिराचा माळ नावाच्या शेतात कापूस वेचणीसाठी गेली होती. शेतात गेल्यानंतर या महिलेने कापूस वेचून ढिगारा घालून ठेवला होता. त्यानंतर अज्ञात मारेकऱ्यांनी आश्विनी इंगळे यांचा गळा आवळून आणि कपाळावर दगड मारून निर्घृणपणे खून केला. मारेकऱ्यांनी आश्विनी इंगळे यांचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह शेजारी शेतकरी राहुल शामराव जाधव यांच्या कापसाच्या शेतात टाकून देऊन पसार झाले. तर मारेकऱ्यांसोबत झालेल्या झटापटीत त्यांच्या अंगावरील शर्ट आणि ब्लाउजच्या गुंड्या तुटून घटनास्थळी पडल्या होत्या. मृतदेहाजवळ दगड, स्कार्फ पडलेला होता. तर मृतदेहापासून काही अंतरावर कानातील एक दागिना, हेअर पिन, वेचुन ठेवलेला कापूस, विळा, जेवणाचा डब्बा, गुटख्याची रिकामी पुडी, पायातील एक बूट व दुसरा बूट काही अंतरावर पडलेला होता.
      दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच
प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पाटील, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, फौजदार श्रीराम काळे, फौजदार दादासाहेब सिद्धे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील तपासणी पथक, आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.
            मयत महिलेचे वडील सर्जेराव भीमराव सोनवणे ( रा. सारणी ( आ. ) ता. केज ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध केज पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे पुढील तपास करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version