पिंपरी-चिंचवड – सराईत गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांना वेगवेगळे हातखंडे वापरावे लागतात.येनकेन प्रकारे गुन्हेगारांवर वचक बसवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा हा उद्देश असतो. असाच एक प्रकार पिंपरी चिंचवड येथे घडला असून गुन्हेगारांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात वाहनांची तोडफोड ही नित्याची बाब आहे. गेल्या आठवड्यात शहरातील पिंपरी, चिंचवड आणि रहाटणी परिसरात तोडफोडीच्या घटना घडल्या. दरम्यान, वाकड पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील सहा आरोपींना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. या आरोपींची दहशत कमी करण्यासाठी वाकड पोलिसांनी मुळशी पॅटर्न स्टाईल धिंड काढत टक्कल केल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक बोलण्यास टाळलं असून घटनास्थळा वरील हत्यारे ताब्यात घेण्यासाठी आरोपींना घेऊन गेलो होतो असे सांगितले आहे.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहाटणी येथे शनिवारी अज्ञात सहा जणांच्या टोळक्यासह दोन अल्पवयीन मुलांनी घराबाहेर बसलेल्या आकाश दत्तात्रय पवार यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. मुख्य आरोपीने पूर्व वैमनस्यातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत कोयत्याने वार केले. शिवाय त्यांच्या घरावर, दरवाजा, खिडकी दगड भिरकावले होते. या घटनेमुळे परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण होते.
तसेच आरोपींनी दहशत पसरविण्याच्या उद्देशाने हुल्लडबाजी केली होती. त्यानंतर पोलिसांनी काही तासातच मुख्य आरोपी कवठेकरसह सर्वांना अटक केली. आज सहा आरोपींच टक्कल करून त्यांची धिंड काढली आहे. यावेळी सर्व नागरिक रस्त्यावरून नेणाऱ्या गुंडाना पाहात होते. पुढे आणि पाठीमागे पोलीस अधिकारी होते. यातून सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्याचा उद्देश असावा हे नक्की.