Site icon सक्रिय न्यूज

महामार्गावरील धुळीने केजकर हैराण 

केज दि.५ – शहरात सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे नागरिकांची खड्डय्यातून सुटका होणार असली तरी रस्त्यावरील धूळ मात्र त्यांना चागलीच छळत आहे. महामार्गाचे काम करणारी यंत्रणा उखडून ठेवलेल्या रस्त्यावर पाणी मारण्याचेही औदार्य दाखवत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.सध्या हिवाळ्याच्या कोरड्या वातावरणात येथील जमीन माती टिकवून ठेवत नसल्यामुळे अगदी  छोट्या वाहनांच्या वर्दळीनेही धुळीचे लोट उडताना दिसत आहेत. परिणामी नागरिक धुळीपासून होणाऱ्या आजारांनी त्रस्त झाले आहेत. 
शहरात सध्या अहमदपूर-जामखेड महामार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणेने शहरातून जाणारा मुख्य रस्ता उखडून ठेवला आहे. त्यातील माती सर्वत्र पसरल्याने रस्त्याच्या दुतर्फा सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. काही भागात रस्त्यावर खड्डे खोदून त्यातील माती रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली़ आहे. शिवाय वाहनांच्या वर्दळीमुळे ही माती हवेत मिसळून धुळीचे लोट उठत आहेत.  वाढत्या धुळीमुळे नागरिकांना घराबाहेर पडतानाच सोबत रुमाल, डोळ्यावर गॉगल घालूनच घराबाहेर पडावे लागत आहे़. मागील चार महिन्यांपासून नागरिक हा त्रास सहन करत आहेत. व्यावसायिक देखील त्रस्त झाले आहेत. त्यात भर म्हणजे ज्या भागात अर्ध्या रस्त्याचे काम पूर्ण झाले, त्या रस्त्यावर देखील मातीचे ढिगारे तसेच पडून असल्याने हवेच्या झोतासोबत माती सर्वत्र पसरत आहे.  या रस्त्यावर तहसील, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, न्यायालय, कृषी कार्यालय, विश्रामगृह,  आणि छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. त्यामुळे वाहन चालकासोबत पादचाऱ्यांना धूळ आणि वाहनांच्या धुराचा सामना करावा लागत आहे. धुळीचे कण चालकाच्या डोळ्यात गेल्यामुळे दोन महिन्यात चार वाहनांना अपघात होऊन ते खड्यात जाऊन उलटण्याच्या घटना घडल्या.  धुळीचा रस्त्यावर तर त्रास होतोच, शिवाय स्थानिक दुकानदारांच्या दुकानात देखील धूळ साचल्याने, व्यावसायिक बेजार झाले आहेत. या धुळीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन काही व्यावसायिकांचे धुळीमुळे डोळे आले आहेत. धुलीकणांच्या तीव्रतेेमुळे नागरिकांना कायमची सर्दी होऊन त्याची ऍलर्जी होण्याची शक्यता आहे. श्‍वसनांचे विकार होऊन यामुळे फुफ्पुसांना त्रास होणे, दमा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नाकातोंडातून धुलीकण आत गेल्याने आधीच दमा असलेल्या रुग्णांना याचा त्रास वाढत आहे. अनेकांचे डोळे सुजून खाज निर्माण होणे, डोळे लाल होणे, त्वचेचे आजार होणे यासारख्या अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे.
——————————————————-
धुलीकण हे वाहनचालकांच्या नाकातोंडात गेल्याने त्यांना विविध आजारांची लागण होण्याची शक्यता असते. यात प्रामुख्याने, डोळ्यावर सूज येणे, खाज येणे, ऍलर्जी होऊन डोळे सतत लाल होणे. त्याचबरोबर सगळ्यात मोठा गंभीर आजार म्हणजे श्‍वसनक्रियेला त्रास होेणे. धुलीकण मानवी शरीरात गेल्याने अर्धवट श्‍वसनक्रिया होऊन रक्तदाब अनियमित होण्याचीही शक्यता असते. सतत धुळीचा संपर्कात येणाऱ्या नागरिकांना खोकला, नाक चोंदने, सर्दी, नाकातून सतत पाणी गळणे, शिवाय धुरके आणि धुळीच्या मिश्रणामुळे त्वचेवर लाल पुरळ येणे, चट्टे येणे, अंगाला खाज सुटणे असे आजार बळावू शकतात. त्यासाठी नागरिकांनी घराबाहेर बडताना मुखपट्टी आणि पूर्ण शरीर झाकले जाईल इतपत कपडे वापरावेत.
डॉ. अर्जुन तांदळे
भुलतज्ञ, जिल्हा रुग्णालय बीड.
शेअर करा
Exit mobile version