मुंबई | राज्य सरकारकडून यंदाच्या दिवाळीसाठी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. परिपत्रक जारी करुन नागरिकांना यावर्षी साध्या पद्धतीने दिवाळी सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
उत्सव कालावधीत ज्येष्ठ नागरिक आणि लहान बालकांनी घराबाहेर पडणं शक्यतो टाळावं. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी. मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, असं आवाहन सरकारने केलंय.
यावर्षी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अशाप्रकारचे कार्यक्रम ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजित करता येऊ शकतील, असं राज्य सरकारकडून सूचित करण्यात आलं आहे.
फटाक्यांची आतषबाजी करु नये. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे कोरोनाचं संक्रमन वाढण्याची भीती आहे. यावर्षी दिवाळी सण कोरोना काळात साजऱ्या केलेल्या अन्य सणांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावी, असं आवाहन सरकारने केलंंय.