पुणे | ट्रॅफिक पोलिसाने रोखल्यावर ना-ना कारणं देत निघून जाणं किंवा पोलिसाशी बाचाबाची करणं या घटना तुम्ही यापूर्वी पाहिल्या असतील. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॅफिक पोलिसासोबत घडलेली ही घटना तुमच्याही काळजाचा थरकाप उडवणारी आहे.
ट्रॅफिक पोलिसाने रोखलं म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये एका चालकाने पोलिसाला थेट बोनेटवर बसवून एक किलोमीटरपर्यंत सुसाट प्रवास केलाय. हा घटनेचा थरार मोबाईल कॅमेरा आणि सीसीटीव्हीत कैद झालाय. मात्र इतरांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्या पोलिसाचा जीव वाचण्यास मदत झालीये.
गुरुवारी युवराज हणवते तोंडाला लावयाचा मास्क गळ्याभोवती ठेवत गाडीतून निघाले. वाहतूक पोलीस आबासाहेब सावंत यांच्या ते निदर्शनास आल्याने कारवाईसाठी हात दाखवत गाडी थांबवली. गाडी थोडी थांबवताच हणवतेंनी गाडी पुन्हा सुरु केली.
यावेळी सावंत यांचा बोनेटच्या दिशेने तोल गेला. सावंत बोनेट वरून खाली उतरणार तेव्हा चालकाने गाडीचा वेग वाढवला. दरम्यान दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांनी गाडीला घेरत गाडी थांबवली. गाडी थांबताच सावंत बोनेटवरून कसेबसे उतरले. त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.