Site icon सक्रिय न्यूज

मोकळ्या मैदानातही भरणार शाळा……..!

बीड – २३ नोव्हेंबरपासून नववी आणि बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. चाळीस मिनिटांचे चार तासच भरणारी ही शाळा खुल्या मैदानात, मोकळ्या जागेत तसेच खेळत्या हवेच्या वर्गात घेण्याची मुभा शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनास दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोनामुळे मोकळ्या वातावरणात शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन शिक्षणात शिकवलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी, शंका समाधान व नवा विषय प्रत्यक्ष वर्गात शिकवला जाईल.

महाराष्ट्र राज्य भौगोलिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळा आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव ही जिल्हाजिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात आहे. अशा वेळी शिक्षण चालू करणे आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण याला विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करूनच अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू होणार आहे. चाळीस मिनिटांची चार तासच शाळा होणार आहे. शाळेला मैदान किंवा मोकळी जागा असल्यास हे वर्ग खुल्या मैदानावर, मोकळ्या जागेत तसेच खेळत्या हवेच्या वर्गात घेण्याचीही मुभा शाळा व्यवस्थापनास दिली आहे. स्थानिक प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, व्यवस्थापक व सरकार यांच्या सामुदायिक जबाबदारीवर एक दिवसआड करून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

शाळा भरवताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची सूचनाही शिक्षण विभागाने यापूर्वीच जाहीर केल्या आहेत. या सूचनांचे पालन होते आहे की नाही याची तपासणी संबंधित अधिकारी करणार आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी जिल्हा प्रशासन व महापालिकेद्वारे शिक्षकांची आरोग्य तपासणी होणार आहे. शिक्षकांनी शिकवताना व विद्यार्थ्यानी शिंकताना मास्क घालने बंधनकारक आहे. आरोग्य विषयक सर्व नियमांचे पालन शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने केले पाहिजे.

प्रत्यक्ष शिक्षकांद्वारे संवाद व सवंगड्यासोबत शिक्षण अनुभव व ज्ञानार्जन करण्यासाठी शाळा सुरू होत आहेत असे करताना विद्यार्थ्यांची काळजी घेणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. कुटुंबातील सदस्य आजारी असलेल्या विद्यार्थ्यांनी व स्वतःचे स्वास्थ्य चांगले नसल्यास खबरदारीचा उपाय म्हणून अशा विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये अशा सुचना ही दिल्या आहेत.

काय आहे शासन निर्णय……!

* सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल अशा प्रकारची बैठक व्यवस्था करावी. एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे व्यवस्था असावी.
* सोशल डिस्टन्सिंग नियमांच्या अंमलबजावणीसाठी विविध चिन्हे, खुणांचा वापर करणे.
* शाळेत स्नेह संमेलन, क्रीड वा अन्य तत्सम गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करू नयेत. शिक्षक-पालक बैठका ऑनलाइन घ्याव्यात.
* विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती आवश्यक असेल.
विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.
* कोविड-19 विषयक जनजागृती करणे.
* शाळा व परिसर निर्जंतुकीकरणविषयक सुविधा सुनिश्चित करणे. शाळेत क्वारंटाइन सेंटर असेल तर स्थानिक प्रशासनाने ते इतरत्र हलवणे. ते तेथून इतरत्र हलवणे शक्य नसेल तर शाळा इतरत्र किंवा खुल्या परिसरात भरवावी.
* शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी 17 ते 22 नोव्हेंबर 2020 यादरम्यान आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल.
* जे शिक्षक कोविड-19 पॉझिटिव्ह असतील त्यांनी डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित राहावे.
* आपत्कालीन, स्वच्छता पर्यवेक्षण आदी विविध कामांसाठी कार्यगट स्थापन करणे.

शाळा सुरू झाल्यानंतर कोणते पाळावे लागणार नियम…..?

* विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतरांचे दररोज थर्मल स्क्रिनींग करावे.
* विद्यार्थी एक दिवसाआड शाळेत उपस्थित राहतील. म्हणजेच 50 टक्के विद्यार्थी शाळेत तर 50 टक्के विद्यार्थी ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहतील.
* गणित, विज्ञान, इंग्रजीसारखे कोअर विषय शाळेत तर अन्य विषय ऑनलाइन शिकवावेत.
* ऑनलाइन आणि ऑफलाइनचे वेळापत्रक तयार करावे.
* शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा.
* शाळेतील वर्गखोल्या, बाहेरील नेहमी स्पर्श होणारे भाग, अध्ययन साहित्य, डेस्क, खुर्च्या आदी वारंवार निर्जंतुक कराव्यात.
* हात धुण्याच्या ठिकाणी साबण, हँडवॉश आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. अल्कोहोलमिश्रित हँड सॅनिटायझर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात यावे.
* स्वच्छतागृहे वारंवार निर्जंतुक करावीत.

शेअर करा
Exit mobile version