लातूर – “जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी” या न्यायाने मराठी पत्रकार परिषद पत्रकारांच्या पाठिशी असते. राज्यात कोरोनानं किंवा तत्सम आजारानं गेल्या चार महिन्यात 43 पत्रकारांचे बळी गेले आहेत. त्यापैकी लातूरचे गंगाधर सोमवंशी एक आहेत. सोमवंशी यांना कोरोना झाला आणि वेळेत आणि योग्य उपचार न झाल्यानं त्यांचं निधन झालं. एका सामान्य पत्रकाराचं कुटुंब रस्त्यावर आलं. ही बातमी जेव्हा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांना समजली तेव्हा त्यांनी डॉ. एकनाथ शिंदे आणि मंगेश चिवटे यांना विनंती करून डॉ. श्रीकांत शिंदे फौडेशनच्यावतीने सोमवंशी कुटुंबियांना मदत करण्याची विनंती केली आणि अखेर त्यास यशही आले. गंगाधर सोमवंशी यांच्या कुटुंबियांना डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून एक लाखाची आर्थिक मदत देण्यात आली. डॉ. एकनाथ शिंदे फौंडेशनने मुंबई आणि ठाण्यातील अनेक पत्रकारांना कोरोना काळात मदत केली आहे. पाथरी आणि अन्य ठिकाणच्या पत्रकारांना देखील फौडेशनने मदत केली आहे. गंगाधर सोमवंशी यांच्या नातेवाईकांना केलेल्या मदतीबदलल मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनचे आभार मानले आहेत. तसेच मंगेश चिवटे यांचे देखील आभार मानले आहेत. ठाण्याचे माजी महापौर आणि लातूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी सोमवंशी यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांना रक्कम दिली.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा प्रमुख नामदेव चाळक, महिला जिल्हा संघटक सुनीता चाळक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, परिषदेचे राज्य प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन, पत्रकार संघाचे अध्यक्ष नृसिंह घोणे, अमर बुरबुरे, राजकुमार मोगले, प़साद सूर्यराव तसेच अन्य स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.