पुणे | आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका प्रखरपणे राबवत आहोत. त्याची जयंतरावांनी काळजी करू नये. फुकटातलं जे मिळालंय ते व्यवस्थित हजम करा, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
फुकटात मिळालेली सत्ता जास्तीत जास्त काळ कशी राहील यासाठी दिवसरात्र मेहनत घ्या, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना दिला आहे.पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी यापूर्वी आम्ही चांगले काम केले आहे. तसेच कौशल्य विकासावर आम्ही अधिक काम करू. सरकारी खात्यात रिकाम्या जागा भरण्यासाठीही प्रयत्न करू, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, ठाकरे सरकार गोंधळलेलं सरकार आहे. सारथी रद्द केली, अण्णासाहेब पाटील महामंडळ बरखास्त केलं, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि महिला अत्याचारांसह विविध मुद्द्यांवर या सरकारचा गोंधळ आहे. या सरकारला कोणताही निर्णय घेता येत नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.