बीड – माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका तरूणीवर ऍसिड हल्ला करून तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आल्याची क्रूर घटना घडली असून उपचारादरम्यान सदरील तरुणीचा मृत्यू झाला आहे. सदरील तरुण तरुणी नांदेड जिल्ह्यातील असल्याचे समजते.
दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणाऱ्या एका 22 वर्षीय तरूणीवर ऍसिड हल्ला केला आणि त्यानंतर तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना येळंबघाट जवळ घडली होती. मात्र मृत्यूशी झुंज अपयशी ठरल्याने तरुणीचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. सदरील तरुणी गावातीलच एका तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतत असताना तरुणाने येेळंब घाट जवळ. दुचाकी थांबवली व तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन जात तिच्यावर तरुणाने अॅसिड हल्ला करत पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जवळपास 12 तास ही तरूणी अर्धवट भाजलेल्या अवस्थेत रस्त्या लगत पडलेली होती. पीडितेचा जबाबा वरून अविनाश राजुरे या तरुणाविरुद्ध नेकनूर पोलीसांत गुन्हा नोंद झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.