Site icon सक्रिय न्यूज

कल्याणी आज भावाला ओवळणार अखेरचं…..!

बीड – आज भाऊ बहिणीच्या नात्याचा मोठा उत्सव आहे. मात्र कोल्हापूरमध्ये कल्याणी ही तिच्या भावाला अखेरचं ओवाळणार आहे. आज भाऊबीज असून सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू आहे तर दुसरीकडे शहिद जवान ऋषीकेश जोंधळे यांचं पार्थिव बहिरेवाडी या त्यांच्या मूळ गावी दाखल झालं आहे. ऋषिकेश जोंधळे यांची बहिण कल्याणी ही आज त्यांना अखेरचं ओवाळणार आहे.

जोंधळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील असंख्य लोक जमा झाले आहेत. त्यांच्या शौर्याला अखेरचा सलाम करण्यासाठी आज अनेक लोक त्यांच्या गावी दाखल झाले आहे.फुलांचा वर्षाव करत नागरिकांनी जोंधळे यांच्या पार्थिवाला वंदन केलं आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्यात शुक्रवारी ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आलं होतं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच पार्थिव बहिरेवाडी गावात दाखल झालं असून देशाच्या रक्षणासाठी अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या या खऱ्या योध्याला नागरिकांनी सलाम केला आहे. पाकिस्तानने 13 नोव्हेंबरला शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला होता. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, या गोळीबारात महाराष्ट्राने आपला वीरपुत्र गमावला आहे.

दरम्य्यान ऋषिकेश जोंधळे दोन वर्षांपूर्वी बेळगावमध्ये सैन्यात भरती झाले होते. ते भरती झाल्यापासून जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते. जोंधळे पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमाभागात तैनात होते. पाक सैन्याकडून शुक्रवारी (13 नोव्हेंबर) पहाटेपासून वारंवार शस्त्रीसंधीचं उल्लंघन केलं जात होतं. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला उत्तर देताना ऋषिकेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराठी हेलिकॉप्टरमधून सैन्याच्या दावाखान्यात नेत असताना त्यांचं निधन झालं.जोंधळे यांना वीरमरण आल्यानंतर त्यांचं पार्थिव कधी गावी परतणार यासाठी संपूर्ण कोल्हापूर वाट पाहत होतं. अखेर आज 4 दिवसांनी त्यांचं पार्थिव गावी दाखल झालं आहे. ‘भारत माता की जय’ आणि ‘वीर जवान अमर रहे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता तर उपस्थित सर्वांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

शेअर करा
Exit mobile version