मुंबई – राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेले म्हणूनच राजू शेट्टी आणि माझ्यात दरी निर्माण झाली. जर शेट्टी प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय देण्यास उतरले तर निश्चितपणे राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावेन, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो. काही मुद्द्यांवर आम्ही वेगळे झालो. याचा अर्थ आमच्या विचारांमध्ये मतभिन्नता नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही दोघेही एकाच विचारधारेतील आहोत, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय.जी मागणी मी केली ती मागणी राजू शेट्टी यांनीही उचलून धरली आहे. त्यांच्यात आणि माझ्यात शेताच्या बांधावरुन भांडण नाही. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या, ऊसाच्या प्रश्नांवर माझे आणि राजू शेट्टींचे एकमत होत असेल तर एकत्रितपणे साखर सम्राटांच्या विरोधात उभे राहू शकतो, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.लुटारूंच्या विरोधात आम्ही दोघेही लढलो.. पण जर आज राजू शेट्टींनी लुटारुंची संगत सोडली तर त्यांना परत खांद्यावर घ्यायला मी तयार आहे, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
दरम्यान यावर राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून एकदा हकालपट्टी केल्यानंतर पुन्हा पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.