Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यातील वाढीव वीज बील रद्द करा – सुमंत धस

बीड जिल्ह्यातील वाढीव वीज बील रद्द करा – सुमंत धस
बीड दि.२० – जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात टाळेबंदीदरम्यान वीजमापनाची कोणतीही तांत्रिक पडताळणी न करता अव्वाच्या-सव्वा वीज देयकं नागरिकांना पाठविण्यात आली. आधीच टाळेबंदीमुळे मंदावलेला उद्योग-धंदा, संसाराची विस्कटलेली आर्थिक घडी सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना हा ‘झटका’ असह्य होता. म्हणून मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ह्याविरोधात आवाज उठविला आहे. 
               स्थानिक पातळीवर वीज देयकं पडताळणी केंद्र उभी केली, वीज वितरक अधिकारी व नागरिक ह्यांचा संवाद घडवून आणला, राज्याच्या उर्जासचिवांची भेट घेतली, पक्षाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांना भेटलं, खासगी वीज वितरक कंपन्या आंदोलनांनी नरमल्या व त्याही अधिकाऱ्यांनी कैफियत मांडण्यासाठी राज ठाकरे यांची भेट घेतली, सरकारच्या कानीकपाळी ओरडूनही सरकार निर्णय घेत नाही असं दिसल्यावर राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार  ह्यांच्याशी वीज बील माफीसंदर्भात राज ठाकरेंनी संवाद साधला. तरीही सरकार ढिम्मच आहे. याउलट सरकारनेच ३६० अंशात भूमिका बदलून ‘नागरिकांनी बिलं भरावीत अन्यथा वीज जोडणी कापू’ अशी अरेरावीची भाषा सुरु केली.
सरकारने वीज बिल माफीसंदर्भात घेतलेल्या यु-टर्न विरोधात राज्यभर आवाज उठविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षाच्या मुख्यालयात पार पडली. त्यानंतर पक्षाचे नेते बाळा नांदगावकर ह्यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडली.
            सरकारची मग्रुरीची भाषा पाहता जनक्षोभ उसळला तरंच वीज बिलांमध्ये दिलासा मिळेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यासाठी रस्त्यावर उतरेल. नागरिकांना आवाहन करत आहोत की वाढीव वीजबिलं भरू नका, सरकारतर्फे वीज जोडणी कापण्यासाठी कुणी आलं तर त्यांना मनसे कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल.
बीड जिल्ह्यातील नागरिकांनी वाढीव वीज बिल भरू नये व वीज पुरवठा तोडण्यासाठी कोणी घरी आलेच तर मनसे च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना संपर्क करा व सोमवार पर्यंत सरकारने वाढीव वीज बिलं  रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही तर मनसे बीड सह महाराष्ट्र भर आंदोलन करणार आहे. या आंदोलनात बीड जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन सरकार समोर आपला रोष व्यक्त करावा असे आवाहन मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल जगताप, दत्ता दहिवाळ, मनसे चे जिल्हा सचिव रवी नेमाने, मनसे चे तालुका अध्यक्ष कल्याण केदार, मनसे चे परळी तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष श्रीराम सावंत, वैजनाथ कळसकर आदींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
शेअर करा
Exit mobile version