बीड दि.20 -राज्यातील शाळा 23 तारखेला सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आज मोठे विधान आल्याने शाळा सुरू होणार की नाही? या बाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.शाळा सुरु होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.
नववी ते अकरावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळा सुरु करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरु करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान दिलेल्या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरु होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरु झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. तसेच यामध्ये ऑनलाईन शिक्षण चालूच राहील, मुलांना शाळेत येणे बंधनकारक नाही, पालकांची संमती आवश्यक, हजेरीवर परिणाम होणार नाही असे मुद्दे पुढे आल्याने मग शाळा नेमक्या सुरू कुणासाठी करायच्या?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा या बंदच ठेवण्यात येणार आहेत.