पुणे – दि.२१ – यावर्षी कार्तिकी यात्रेनिमित्त निघणाऱ्या दिंड्यांसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्तच्या दिंड्यांना पंढरपूरात परवानगी नाकारण्यात आली असल्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रातील जिल्ह्यातून कार्तिकी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात दिंड्या दाखल होतात. मात्र यंदा देवस्थानात करायचे नित्योपचार काही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळून करण्यात येणार आहे.राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर अजूनही नियंत्रण मिळालेलं नाही. 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून या यात्रेत गर्दी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.
देवस्थानात नित्योपचार हे कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करुन होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून पंढरपूरकडे दिंड्या मार्गस्थ होणार नाहीत. याबाबत पोलीस तसंच जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.