Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात आजपर्यंत २० शिक्षक आढळले कोरोना बाधित, केज तालुक्यातील दोघांचा समावेश……..!

केज दि.२१ – येत्या २३ तारखेला शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर ९ वी ते १२ वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांना कोरोना टेस्ट अनिवार्य केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिक्षक आपली टेस्ट करून घेत आहेत. आजपर्यंत सुमारे अडीच हजार शिक्षकांनी आपली टेस्ट करून घेतली असून प्राप्त झालेल्या १२४४ अहवालात २० शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे.
          मागच्या दोन ते तीन दिवसांपासून प्रत्येक तालुक्यात कोरोना टेस्ट करून घेण्यासाठी शिक्षकांच्या रांगा लागल्या आहेत. प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांना कोरोना टेस्ट करून घेण्यासाठी वेळापत्रक तयार करून देण्यात आलेले आहे. त्यानुसार कोरोना टेस्ट व्हावी अशी अपेक्षा आहे.
        दरम्यान आजपर्यंत करण्यात आलेल्या २४७६ टेस्ट पैकी १२४४ अहवाल प्राप्त झाले असून अंबाजोगाई ३, बीड ३, गेवराई ७, केज २, परळी ३ तर शिरूर कासार २ असे एकूण २० शिक्षक कोरोना बाधित आढळून आले आहेत.
——————————————–
अनिवार्य असल्याने झाले उघड…..!
       दरम्यान यातील बहुतांश शिक्षकांना कसल्याही प्रकारचे लक्षणे नसल्याचे सांगितले. त्यामुळे स्वतः होऊन टेस्ट करून घेण्याचा प्रश्न येत नव्हता.मात्र टेस्ट अनिवार्य केल्यामुळे लागण झाल्याचे समोर आले आहे. तर आणखी बऱ्याच शिक्षकांची टेस्ट करणे बाकी असल्याने यामध्ये किती अहवाल पॉजिटिव्ह येतात हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर समजणार आहे.
——————————————–
वेळापत्रकानुसारच टेस्ट करून घ्यावी – डॉ.आठवले
      दरम्यान केज तालुक्यातील ६८५ शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात येणार असून शाळेनुसार वेळापत्रक देण्यात आलेले आहे. मात्र एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शिक्षकांनी आपल्याला दिलेल्या दिवशीच तपासणी करून घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यातील शाळा उघडणार दोन टप्प्यात…….!

बीड दि.२१ – सोमवारपासून (दि.23) शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 9 वी ते 12 वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांची कोव्हीड टेस्ट करून घेण्यात येत आहे. मात्र 23 तारखेपर्यंत सर्व शिक्षकांची टेस्ट पूर्ण होत नसल्याने जिल्ह्यातील सरसकट शाळा सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे 22 तारखेपर्यंत ज्या शाळेतील शिक्षकांच्या टेस्ट पूर्ण होईल त्या शाळा 23 तारखेला तर उर्वरित शाळा 25 तारखेला सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी विक्रम सारूक व प्राथमिक चे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
       दरम्यान जिल्ह्यातील 768 शाळेतील 6600 शिक्षकांपैकी 2627 शिक्षकांची तपासणी झाली असून 1244 प्राप्त अहवालात 20 शिक्षक कोरोना बाधित आढळून आले आहेत.तर उर्वरित अहवाल रविवारी प्राप्त होतील.
शेअर करा
Exit mobile version