बीड दि.२३ – आज पासून शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने मागच्या चार पाच दिवसांपासून जिल्ह्यातील शिक्षकांची कोव्हीड टेस्ट करण्यात येत आहे. दि.२२ पर्यंत जिल्ह्यातील 4422 शिक्षकांची टेस्ट करण्यात आली असून 3596 अहवाल प्राप्त झाले आहेत.यामध्ये 44 शिक्षक कोरोना बाधित आढळून आले आहेत, यामध्ये केज तालुक्यातील तिघांचा समावेश आहे.तर 4422 पैकी 826 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील सर्वच शासकीय कोव्हीड सेंटरवर टेस्ट करून घेण्यासाठी शिक्षकांच्या रांगा लागत आहेत.
दरम्यान सोमवारी जिल्ह्यात शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी सर्व शिक्षकांची कोव्हीड टेस्ट न झाल्यामुळे कांही ठिकाणी शाळा उघडल्या तर कांही ठिकाणी बंदच राहिल्या. तर ज्या शाळा उघडल्या तिथेही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अल्पच दिसून आला. पालकांचे संमतीपत्र आवश्यक असल्याने पहिल्या दिवशी शिक्षक पालकांचे संमतीपत्र घेण्यासाठी पालकांशी संपर्कात होते.
दरम्यान केज तालुक्यातील 87 शाळांपैकी ज्या शाळेतील शिक्षकांची कोव्हीड टेस्ट झाली आहे अश्या 42 शाळा आज सुरू झाल्या.तर केज गटसाधन केंद्राचे गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनी शहरातील कांही शाळांना भेटी देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी शाळा सुरू करताना ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अन्यथा हयगय झाल्यास संबंधित प्राचार्य/मुख्याध्यापक यांना जबाबदार धरण्यात येईल अशा सक्त सूचनाही देण्यात आल्या.