पुणे दि.२६ – पुण्यामध्ये सध्या मेट्रोचं काम सुरु आहे. स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रोचं खोदकाम सुरु करण्यात आलं आहे. खोदकामादरम्यान एका प्राण्याचे प्रचंड मोठे असे अवशेष आढळून आले आहेत.
सध्या हे हाडांचे अवशेष पुरातत्वविभागाकडे सोपवण्यात आले असून पुरातत्व विभागातील संशोधकांच्या अंदाजानुसार, हे अवशेष किमान दोन हजार वर्षांपूर्वीचे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मेट्रोच्या खोदकामा दरम्यान मंडई परिसरात हे अज्ञात प्राण्याचे अवशेष सापडले आहेत. कामगारांनी खोदकाम सुरु केल्यानंतर अवघ्या दहा मीटर अंतरापासून प्राण्यांची हाडं सापडली. त्यानंतर हे अवशेष काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आली.ही हाडं हत्तीची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हाडं सापडलेल्या ठिकाणी पुरातत्व खात्यामधील जाणकार तसंच इतिहास संशोधकांनी भेट दिली असून या हाडांचा अभ्यास केल्यानंतर रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे.