पूर्णा दि.28 – तालुक्यातील मौ.कंठेश्वर (ता.पूर्णा जि. परभणी) येथे उसाची कापणी करताना एका यंत्राचा लोंबकळणार्या हायहोल्टेज विद्युत वाहिणीस स्पर्श झाल्याने या घटनेत दोघांचा विजेचा मोठा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि.२७ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घड़ली असून चुडावा पोलिस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील कंठेश्वर शिवारात शुक्रवारी ऊस कापणी यंत्र घेऊन अमोल जोगदंड कापणी झालेला ऊस कारखान्याला पोचविण्यासाठी एका वाहनाव्दारे श्री. कर्हाळे हे शेतकरी त्र्यंबक कदम यांच्या शेजारी ऊस काढणी करत होते. या शेतातून ११ केव्हीच्या वीज वाहिन्या गेलेल्या आहेत. ऊस यंत्राव्दारे कापणी केलेला ऊस अमोल जोगदंड वाहनात भरत असताना लोंबकळणार्या तारांशी यंत्राचा स्पर्श झाला. विद्युत प्रवाह यंत्रात उतरल्याने अमोल जोगदंड यांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहन चालक कर्हाळे हे अमोल याला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनाही विजेचा जबर धक्का बसल्याने ते दूर फेकल्या गेल्या. तेथे असलेल्या कर्हाळे यांच्या भावाने तातडीने दोघांनाही पूर्णेच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती समजताच चुडावा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी देवकते, फौजदार पंडीत, जमादार सूर्यकांत केजगीर, प्रवीण टाक आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.