Site icon सक्रिय न्यूज

कोरोनाच्या काळात 60% विवाह इच्छुकांचे स्वप्न भंगले……….!

बीड दि.30 – ऐन लग्नसराईच्या काळात आलेल्या कोरोनाची साथ आणि लॉकडाउनमुळे धुमधडक्यात लग्न करण्याचे तरुण-तरुणींचे स्वप्न धुळीत मिळाले आहे. कोरोनामुळे यंदा लग्न करु इच्छिणार्‍या अनेक तरुण-तरुणींना लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे.

तसेच लॉकडाउनमुळे अनेक तरुण-तरुणींच्या नोकर्‍या गेल्याने आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मुंबई आणि उपनगरात खासगी कंपनीत काम करणार्‍या तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईत अनेक उद्योगांना फटका बसला असून हॉटेल, रिटेल आणि त्यांच्याशी संबंधित उद्योग बंद पडल्याने लाखो कर्मचार्‍यांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. त्यामुळे यंदा लग्न करण्याचा विचार असलेल्या तरुणांना तो बेत रद्द करावा लागला आहे. इतकेच नव्हे तर काही जणांना ठरलेले लग्न नोकरी गेल्यामुळे मोडावे लागले आहे.

कोरोना काळात अनेक तरुणांच्या नोकर्‍या गेल्यामुळे आता अगोदर नोकरी शोधा आणि नंतर छोकरी, अशी अनेकांनी अवस्था झालेली आहे. 

कोरोना काळात कमी खर्चात रजिस्टर लग्नाचा पर्यायही बहुतेक मुंबईतील तरुण स्वीकारतील, असे वाटत होते. पण मुंबई शहर व उपनगरातील रजिस्टर लग्नांची संख्या यंदा सुरुवातीपासून कमी झालेली दिसत आहे. मुंबई शहरात गेल्या वर्षी १ हजार २९९ लग्न रजिस्टर पध्दतीने झाली होती. मात्र कोरोना काळात नोंव्हेबरपर्यंत ४४८ लग्न रजिस्टर पध्दतीने झाली आहेत. हीच परिस्थिती उपनगरातील मॅरेज रजिस्टर कार्यालयात दिसून येत आहे. गेल्या वर्षी ३ हजार ४९५ लग्न रजिस्टर पध्दतीने झाली होती. यंदा १ हजार ८०६ लग्न रजिस्टर पध्दतीने झाली आहेत.

शेअर करा
Exit mobile version