मुंबई दि.१ -ओबीसींना आरक्षण मिळावे, यासाठी मंडल आयोगाची अंमलबजावणी करा अशी मागणी आम्ही पवार साहेबांकडे केली होती. पवार यांनी त्याला तत्काळ मान्यता दिली. मराठा समाज ओबीसींच्या १७ टक्क्यात आला तर त्यांना काहीच मिळणार नाही. मराठा समाजाच्या नेत्यांची देखील ओबीसीमधून आम्हाला आरक्षण नको, अशी मागणी आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची आमची मागणी आहे , असे मत राष्ट्रवादीचे नेते तथा अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ पुढे म्हणाले की, मराठा समाजाच्या नेत्यांची देखील ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्या, अशी मागणी आहे. मात्र, काही लोक निव्वळ द्वेषाचे राजकारण करत आहेत का? याची माहिती घ्यावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. सरकारमध्ये दरवर्षी 3 टक्के लोक रिटायर होतात. भरती करायची नाही तर लोक कामाला कुठून मिळणार ओपनमधूनसुद्धा मराठा समाज येतो. त्यामुळे सगळ्यांच्या आड येण्याचे कारण काय? तुम्हाला आरक्षण हवे म्हणून बाकीच्यांवर अन्याय का? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.ओबीसी आरक्षणावर गदा येत असेल तर बोलणारच असे सांगत त्यांनी ओबीसी मोर्चाचे समर्थन केले. तसेच मोदींनी दहा टक्के इबीसीला आरक्षण दिले. मग, मराठा समाजाला आरक्षण द्यायला लावा. राज्यात 5 वर्षे सत्ता होती. मग तुम्ही का नाही दिले? असा जाब पालकमंत्री भुजबळ यांनी भाजपला विचारला. आम्ही सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. मात्र, काही जण ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी करत आहेत. पाठिंबा असून ही या विषयाची दिशा या दिशेने सरकत असेल तर त्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला पुन्हा एकत्र यावे लागेल, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले होते.