Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात असलेल्या बिबट्याची दहशत परभणी जिल्ह्यात……!

परभणी दि.३ – शेजारच्या बीड जिल्ह्यात थैमान घालत नरभक्षक बनलेल्या बिबट्यास परभणी जिल्ह्याच्या सीमेच्या आत घुसूच देऊ नका अशी विनंती परभणीचे सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जिल्हा वन अधिकारी यांच्याकडे  केली आहे.
          बीड जिल्ह्यामध्ये नरभक्षक झालेल्या बिबट्याने आजपर्यंत तीन माणसाचा बळी घेत कित्येक माणसांना जखमी केले आहे. काही जनावरांचा फडशाही पाडला आहे. त्याला पकडण्यासाठी बीड जिल्हा वनविभागाने मोठी मोहीम राबवली असली तरी तो आजपर्यंत जाळ्यात अडकलेला नाही. मुंबई पुणे या ठिकाणच्या वन विभागातील ट्रेनर कर्मचाऱ्यांनाही यासाठी पाचारण करण्यात आले आहे. मात्र त्याचा अद्याप तरी काहीच उपयोग झालेला नाही. बीड जिल्ह्यातल्या घटना सोशल माध्यमात व्हायरल होत असल्यामुळे शेजारच्या परभणी जिल्ह्यातही शेतामध्ये काम करणारा सर्वसामान्य माणूस, शेतकरी भयभीत झालेला आहे. दिवसा वीज नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागत आहे. येत्या दोन दिवसात कॅनॉलला पाणी येणार असल्यामुळे रात्री अंधारात शेतात जाणाऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता आपण तात्काळ तो जिल्ह्याच्या सीमेच्या आत घुसू नये यासाठी काही तरी उपाययोजना करावी अशी विनंती बोबडे यांनी  अधिकाऱ्यांना केली.
               दरम्यान तो बिबट्या जिल्ह्याच्या आत घुसू नये यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर जाळी बसवणे, फटाक्याचा आवाज करणे अथवा जाळ (आग) करणे आदी सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या आहेत. वनाधिकाऱ्यांनी दखल घेऊन वरिष्ठांना ही माहिती कळवू असे आश्वासन दिले.
शेअर करा
Exit mobile version