कोल्हापूर दि.6 – इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी आणि शनिवार दरम्यान मध्यरात्री मोठी कारवाई केली. इचलकरंजी नजीक जयसिंगपूर येथील संभाजीनगर परिसरात पोलिसांनी महिलांच्या जुगार अड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एकूण 37 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 7 महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे.
जुगार अड्यावर पत्ते खेळणाऱ्या सर्व महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. संबंधित महिलांवर खिसे कापणे, चोरी, यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सातही महिलांवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. सदरची कारवाई इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख विकास जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत जयसिंगपूर पोलिसांनी देखील सहभाग घेतला.
संभाजीनगर येथे एका घरात तीनपानी पत्याचा जुगार चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखाला मिळाली. ही माहिती खरी की खोटी याची खातरजमा पोलिसांनी केली. त्यानंतर इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेने जयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने जुगार अड्यावर छापा टाकला. सदरील कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक गड विभाग जयश्री गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी पथकाद्वारे करण्यात आली.