बीड दि.९ – वडील सतत दारू पिऊन त्रास देत असल्याने संतापलेल्या मुलाने मामाच्या मदतीने त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर झालेल्या वडिलांचा दुसऱ्या दिवशी (दि.०५) मृत्यू झाला. परळी तालुक्यातील वानटाकळी येथील या प्रकरणात मुलासह मामावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विलास रामराव मुंडे (वय ४७, रा. वानटाकळी, ता. परळी) असे मुलाच्या मारहाणीत मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची मुलगी निशिगंधा हिने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे कि, शुक्रवारी (दि.४) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ती, आई, भाऊ ऋषिकेश आणि वहिनी हे सर्व जेवण करून घरात बसले होते. यावेळी तिचे वडील विलास हे दारू प्राशन करून आले आणि घरासमोर उलट्या करू लागले. हे पाहून विलास यांचा मुलगा ऋषिकेशचा पारा चढला. त्याने मामा भागवत साहेबराव हांगे यास बोलावले. दारू पिऊन सतत त्रास का देतोस असे म्हणत त्या दोघांनी विलास यांना लोखंडी पाईप आणि काठीने पाठीवर, पोटावर बेदम मारहाण केली. यावेळी आई, मुलीने मध्यस्थी करत विलास यांना सोडविण्याचा प्रयत्न केला परंतु संताप अनावर झालेल्या मामा-भाच्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देत बाजूला काढले. थोड्यावेळाने दोघेही तिथून गेले. त्यानंतर जखमी अवस्थेतील विलास यांनी संपूर्ण रात्र बाजूच्याच गिरणीत काढली. दुसऱ्या दिवशी (दि.५) सकाळी ६ वाजता निशिगंधाने वडिलांना चहा दिला आणि त्यांची अवस्था पाहून रुग्णालयात जायचे का असे विचारले. परंतु, विलास यांनी त्यास नकार दिला. दुपारी २ वाजताच्या सुमारास विलास यांची तब्येत अधिकच खालावली. त्यामुळे पत्नी शिवकन्या आणि मोठा मुलगा विकास यांनी त्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे दुपारी ०३.५५ वाजता डॉक्टरांनी विलास यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतरही दोन्ही आरोपींनी झालेल्या घटनेबद्दल कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी कुटुंबियांना दिली. तरीदेखील निशिगंधाने हिम्मत करून पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. सदर फिर्यादीवरून ऋषिकेश विलास मुंडे आणि भागवत साहेबराव हांगे या मामा-भाच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पीएसआय व्ही.बी. केंद्रे करत आहेत.
दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली असून त्यांना बुधवारी (दि.९) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.