अहमदनगर दि.१० – शिर्डी साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडाबाबत लावलेला बोर्ड हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई रवाना झाल्या होत्या. दरम्यान पोलिसांनी त्यांना नगरच्या सीमेवर सुपे टोलनाक्याजवळ रोखत ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तृप्ती देसाईंसोबत त्यांच्या कार्यकर्त्यांना सुपे पोलीस ठाण्यात नेण्यात आलंय. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली.
तृप्ती देसाई म्हणाल्या, “साई संस्थानाकडून महिलांच्या कपड्यांबाबत लावलेला बोर्ड हटवण्यासाठी आम्ही शिर्डीला जातोय. या माध्यमातून आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न होतोय. आमचा हक्क मिळवण्यासाठी आम्ही शिर्डीकडे निघालो आहोत.”
पोलिसांनी नगरच्या आधीच आम्हाला अडवलं असून हा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. परंतु पोलिसांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही शिर्डीला जाणारच, असंही त्या म्हणाल्या.