Site icon सक्रिय न्यूज

केज शहरात रस्त्यासाठी पाऊण तास चक्का जाम………!

केज दि.१४ – केज शहर अंतर्गत सुरू असलेल्या महामार्गाचे काम विनाविलंब व दर्जेदार करावे या मागणीसाठी आज केज विकास संघर्ष समितीने केज च्या मुख्य महामार्गावरील महात्मा फुले चौकात तब्बल पाऊण तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या दूरवर रांगा दिसून आल्या.
            केज शहरातून सध्या राष्ट्रीय महामार्ग क्र 548 सी  खामगाव-पंढरपूर व महामार्ग क्र 548 डी अहमदपूर- अहमदनगर या दोन महामार्गांचे शहर अंतर्गत काम सुरू आहे. मात्र या दोन्ही रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे केज विकास संघर्ष समितीचे म्हणणे आहे. यासाठी वरील काम करणाऱ्या कंपनी व त्यांच्या यंत्रणेशी समितीने विविध आंदोलने व निवेदनाद्वारे पाठपुरावाही केला होता. मात्र त्यावर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने समितीने सोमवारी दुपारी एक वाजता येथील महात्मा फुले चौकात बेमुदत रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी एस ए इंट्रा कंपनीचे टीम लीडर रविकुमार, उपअभियंता अशोक इंगळे, डिजीएम एन. जी. शिंदे, विकास देवळे इत्यादी अधिकाऱयांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून समितीच्या सर्व मागण्या मान्य करून तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. समितीच्या मागणीवरून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक यामधील रस्त्याच्या विस्तारित कामाचा आराखडा तांत्रिक मंजुरीच्या अंतिम टप्यात असल्याने या रस्त्याचे काम विस्तारित प्रस्ताव मंजूर होताच तात्काळ सुरू करण्यात येईल व राहिलेल्या भागातील काम तात्काळ पूर्ण करण्याची हमी यंत्रणेच्या वतीने देण्यात आली.
            मात्र कंपनीने मागण्यावर तात्काळ कार्यवाही न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे. या आंदोलनात समितीचे समन्वयक हनुमंत भोसले, महेश जाजू, नासेर मुंडे, एम. डी. घुले, अनुसया बिक्कड, निर्मला बनसोडे  यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी आंदोलनस्थळी केज पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
शेअर करा
Exit mobile version