बीड दि.१५ – दिनांक 15/12/2020 रोजी बीड येथील मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय एच. एस. महाजन यांनी फिर्यादीची मुलगी समीना, वय-26 वर्ष हीस तिचा पती अस्लम याकुब शेख, वय-30 वर्ष, रा.गुळज, ता.गेवराई याने जिवे ठार मारल्याप्रकरणी आजन्म कारावास व 25,000/- रु दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरीक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की, प्रकरणातील फिर्यादी शेख रशीद शेख अब्दुल, रा.दादेवाडी तहत खळेगाव, ता.गेवराई यांची मयत मुलगी समीना, वय-26 वर्ष हीचे सन 2010 मध्ये यातील आरोपी अस्लम याकुब शेख, वय-30 वर्ष, रा.गुळज, ता. गेवराई यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. फिर्यादीची मुलगी समीना हीस लग्नानंतर दोन वर्ष सासरच्या लोकांनी व्यवस्थीत नांदविले व नंतर कौंटुबीक व लग्नातील मानपानाच्या कारणावरून शारीरीक व मानसीक त्रास देऊ लागले. याबाबत मयत समीना ही सणावाराला माहेरी आल्यावर होत असलेल्या त्रासाबाबत वडीलांना सांगत असे. परंतु वडील तिची समजूत घालुन नांदावयास पाठवत असत. समीनाने त्रास सहन करून संसार केला. त्या दरम्यान दिला चार अपत्येही झाली. परंतू सासरचे लोक समीना हीस तुझ्या माहेरहून घर बांधण्यासाठी दोन लक्ष रुपये घेऊन ये अशी मागणी करून लागले. मागणी पुर्ण होत नाही म्हणुन तीस मानसीक व शारीरीक त्रास देऊन मारहाण करू लागले.
दरम्यान दिनांक 17/10/2017 रोजी सकाळी फिर्यादीस फोन द्वारे कळले की, समीना हीचे दुखत असून ती बोलत नाही. असे कळले वरून फिर्यादी व गावातील मित्र मंडळी समिनाच्या सासरी गुळज येथे गेली. समिनाच्या घरात जाऊन पाहिले असता, समिना मृत अवस्थेत आढळून आली. तिचा गळा काळा निळा होऊन सुजलेला दिसून येत होता. तसेच हनुवटीला मारलेले ओळखन दिसून येत होते. फिर्यादीने पोलीस ठाणे चकलांबा येथे गु.र.नं.235/2017 कलम 302,498 (अ)323,506.34 भादंवि अन्वये अस्लम याकुब शेख, सलाम याकुब शेख, आसीफ याकुब शेख, याकुब बनेमिया शेख, कलीमुन्नीसा ऊर्फ कलीमा याकुब शेख याच्याविरूध्ध फिर्याद नोंदविली.
प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एन. एम. शेख यांच्याकडे वर्ग करण्यात आला. तपासीक अधिकारी यांनी आरोपीताविरूध्द सबळ पुरावा गोळा करून मुदतीत दोषारोप पत्र मा. न्यायालयास सादर केले.
प्रकरणाची सुनावणी मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय श्री एच. एस. महाजन यांच्या न्यायालयात होऊन दिनांक 15/12/2020 रोजी अंतीम न्यायनिर्णय पारीत करण्यात आला. मा. न्यायालयाने मयताचा पती अस्लम याकूब शेख यास कलम 302 भादंवि अंतर्गत दोषी धरून आजन्म कारावास व 25,000/- रु दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरीक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. तर इतर आरोपीतास मा. न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील बी. एस. राख यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज सफौ सी. एस. इंगळे यांनी पाहिले.