मुंबई दि.१७ – कोरोनाचं लसीकरण राज्यात केव्हा सुरु होणार याबाबत सर्वांच्या मनात प्रश्न आहे. अखेर यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असून भारतात लवकरच लस उपलब्ध होणार आहे. यासाठी राज्य सरकारने देखील लसीकरणासाठी पूर्व तयारी केली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “केंद्र सरकारला खात्री असेल तर त्यांनी परवानगी द्यावी. मला वाटतं की, डिसेंबरच्या अखेरपर्यंत जर केंद्र सरकारने परवानगी दिली तर जानेवारीपर्यंत लसीकरणाचा कार्यक्रम राबवता येईल.”
दरम्यान राज्यात होणारे लसीकरण हे कसं असेल याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. राजेश टोपे म्हणाले, “लसीकरणाच्या कार्यपद्धतीनुसार तयारी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये ज्या व्यक्तीला लस द्यायची आहे त्या व्यक्तीला लसीकरणासंदर्भात मेसेज मिळणार आहे. हा मेसेज मिळाल्यालर त्या व्यक्तीने आपलं ओळखपत्रासह त्या दिवशी हजर रहायचं आहे.”
ते पुढे म्हणाले, “एकदा का एखाद्या व्यक्तीचं लसीकरण झालं की त्यानंतर अर्धा तास त्या व्यक्तीला तिथेच थांबवण्यात येणार आहे. यासाठी आपल्याकडे एकूण 18 हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेली आहे.”