बीड दि.18 – शिक्षणासाठी असणारी संकुले संपन्न ठेवण्यासाठी राज्य सरकारने मराठवाड्यासाठी तब्बल २०० कोटीची भरीव तरतूद केली आहे ज्यामुळे शिक्षणाची दारे उजळणार आहेत. ना . धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यासाठी सरकार कडून सर्वाधिक शाळांना हा निधी दिला आहे. यासाठी पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आभार व्यक्त केले आहेत .
मराठवाड्यातील सन १९६० पूर्वीच्या निजामकालिन जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याचा मार्ग मोकळा झाला असून शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे २०० कोटी रुपयांचा निधी नुकताच पुरवणी मागणीत मंजूर झाला आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद येथील १३० शाळा, बीड येथील २०३ , हिंगोली येथील ४२ , जालना येथिल २०३ , लातूर येथील ९४ , नांदेड येथील १५७ , उस्मानाबाद येथील ५१ , परभणी येथील ७५ अशा एकुण एक हजार ४५ शाळांमधील सुमारे साडेतीन हजार वर्गखोल्यांचे नविन बांधकाम या निधीतून करण्यात येणार आहे.
मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचे बांधकाम व दुरुस्ती करण्यात येणार असून शासकीय शाळांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यात पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देण्याबरोबरच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अभ्यासक्रमात सुधारणा आणि शिक्षकांचे प्रशिक्षण यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
संपन्न शिक्षणासाठी समृद्ध संकुले – ना. धनंजय मुंडे
जिल्ह्यातील शाळांच्या इमारती हा अनेक दिवसापासूनचा प्रश्न चर्चेत होता , जिल्ह्यातील निजामकालीन २०३ शाळांना भरीव निधी राज्य सरकारने दिला असून यापुढे देखील शैक्षणिक संकुले समृद्ध करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांना बोलताना म्हटले आहे .
जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा आदर्श होऊन येथील पिढी सर्व गुण संपन्न घडवण्यासाठी आपण जबाबदार असल्याचे देखील ना . धनंजय मुंडे यांनी सांगितले .