मुंबई दि.१९ – मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाई जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. कार्यकारी अध्यक्षपदासाठी चरणसिंह सप्रा यांची वर्णी लागली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे या सर्व नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक जणांच्या नावांची चर्चा सुरु होती. ज्यामध्ये अस्लम शेख, मिलिंद देवरा, वर्षा गायकवाड यांच्या नावांचा समावेश होता.
दरम्यान महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांची कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सेक्रेटरी म्हणून निवड केली आहे.
पुण्यात शिक्षण घेतलेल्या साठे यांना तेथील विधानसभा निवडणुकीपूर्वी आसामचा कार्यभारही देण्यात आला आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या साठे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयूआय) च्या माध्यमातून 1992 मध्ये केली. नंतर त्यांनी अखिल भारतीय युवा कॉंग्रेसचे सचिव म्हणून काम पाहिले. 2007 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ते राहुल गांधी यांच्या मूळ गटाचे सदस्य होते.