बीड दि.28 – डीएड करुनही नौकरी लागतं नसल्याने ३२ वर्षीय सुशिक्षित बेरोजगार तरुणाने रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आसरडोह येथे रविवारी (दि.२७) रोजी सकाळी घडली.
बारावी नंतर डीएड अन् शिक्षक म्हणून नौकरी पक्की असे चित्र काही वर्षांपूर्वी होते. त्यामुळे धारुर तालुक्यातील आसरडोह येथील बाळासाहेब ज्ञानदेव काजगुंडे ( वय ३२ वर्ष ) या तरुणाने डीएड केले. पण मागच्या काही वर्षापासून शासनाने डीएड च्या जागाच न भरल्याने अनेक तरुण नौकरीच्या प्रतिक्षेत आहेत. शिक्षण घेऊनही नौकरी लागतं नाही अन काही कामही करता येत नाही. या नैराश्यातून बाळासाहेब काजगुंडे याने रविवारी सकाळी रहात्या घरात माळवदाच्या हळकडी ( हुक) यास दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील घटनेची आडस येथील पोलीसांना माहिती मिळताच पो.कॉ. तेजस ओव्हाळ यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. धारुर येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. बाळासाहेब काजगुंडे यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.