माळशिरस दि.30 – अति उत्साहात बेभान होऊन तरुणाई वाट्टेल ते करतात. आपण जे करत आहोत याचे परिणाम काय होतील याचा विचार न केल्याने पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ आल्याशिवाय राहत नाही. असाच इक प्रकार माळशिरस तालुक्यातील एका गावात घडला असून पोलीसी कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
माळशिरस तालुक्यातील सात तरुणांना पकडून अकलूज पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर कलम 4/25 व मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पिसेवाडी येथील शहाजी इंगळे, दीपक भाकरे, शैलेश भाकरे, महेश भाकरे, सागर चव्हाण, सतीश इंगळे आणि समाधान भाकरे या सात जणांनी हातामध्ये तलवार सुरी, लाकडी दांडके घेऊन फोटो काढले होते आणि ते सोशल मीडियावर अपलोड केले होते.
सात तरुणांनी एकसाथ हातात शस्त्र घेऊन ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या सात पोरांचा नेमका इरादा काय होता? हातात शस्त्रं घेऊन त्यांना नेमकं काय करायचं होतं? असे प्रश्न उपस्थित झाल्याने पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे.