Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध च्या मार्गावर…….!

केज तालुक्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध च्या मार्गावर…….!
केज दि.३१ – तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३८५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून १८१ जागेसाठी एकूण उमेदवारी अर्ज ६३७ प्राप्त झाल्याची माहिती नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांनी दिली. 
        केज तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीची  सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू असून २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज मागविण्यात आले. बुधवारी शेवटच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला. त्यामुळे सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू होती. तर शेवटच्या दिवशी ३८५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तर आदल्या दिवशी २३१ आणि त्यापूर्वी २१ असे २५२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. आता २३ ग्रामपंचायतीच्या १८१ जागेच्या निवडणुकीसाठी एकूण ६३७ इतके उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार असून त्यानंतर ४ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे निवडणुकीतून किती जण माघार घेतात ? यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
आंधळेवाडी, मोटेगाव ग्रामपंचायती बिनविरोधच्या मार्गावर…….!
केज तालुक्यातील आंधळेवाडी ग्रामपंचायतीच्या सात जागेसाठी सातच अर्ज दाखल झाले आहेत. तर मोटेगाव ग्रामपंचायतीच्या सात जागेसाठी गावात ओबीसी प्रवर्गाचा उमेदवार नसल्याने केवळ पाचच अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा असून केवळ बिनविरोध घोषणेची औपचारिकता बाकी आहे.
शेअर करा
Exit mobile version