लखनऊ दि.३१ – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात एका गावात एक पाकिस्तानी महिला गावची सरपंच झाली आहे. विशेष म्हणजे ती सरंपच झाल्यावर ती पाकिस्तानची असल्याचे लक्षात आले आहे.
उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यातील गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. सरपंच बनण्यासाठी तिने बनावट आधारकार्ड, मतदान कार्डसुद्ध बनवलं. यासंदर्भात माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. बानो बेगम असं या महिलेचं नाव असून ती 64 वर्षाची आहे. बानो बेगम 35 वर्षांपूर्वी एटा येथील एका गावात तिच्या नातेवाईकांकडे आली. दरम्यान तिने अख्तर अली नावाच्या स्थानिक तरूणाशी विवाह केला. तेव्हापासून ती भारतीय व्हिसा मिळवून भारतात रहात आहे. मात्र तिला अजुनही भारतीय नागरिकत्व मिळालेलं नाही. गावातील कुवैदन खान यांना या महिलेबाबत संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी महिलेने आधार कार्ड व इतर कागदपत्रे कशी मिळविली याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामागे जो कोणी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हा दंडाधिकारी सुखलाल भारती यांनी सांगितलं आहे.