केज दि.३१ – एका ४० वर्षीय शेतकऱ्याच्या कानसुलाला मुलाने पिस्तुल लावले. तर त्याच्या वडीलाने चाकूने हल्ला केल्याची घटना केज तालुक्यातील बेलगाव येथे घडली. याप्रकरणी बापलेकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
बेलगाव येथील शेतकरी पांडुरंग रघुनाथ चौरे ( वय ४० ) हे ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घरासमोर उभे असताना प्रताप नरसिंग दातार, नरसिंग लिंबाजी दातार ( दोन्ही रा. बेलगाव ता. केज ) व त्यांचे दोन साथीदार हे त्यांच्या जवळ आले. प्रताप याने त्याच्या जवळची पिस्तुल काढून पांडुरंग चौरे यांच्या कानसुलाला लावून तुझा भाऊ कुठे आहे सांग ? असे म्हणाला. तर त्याचे वडील नरसिंग दातार यांनी जवळील चाकूने चौरे यांच्या डाव्या हाताचे पोठरीवर वार करून जखमी केले. त्यांचा चुलत भाऊ सोडविण्यासाठी आला असता त्याला इतर दोन अनोळखी इसमांनी काठीने मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्याने मारहान करून मुकामार देत जिवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. पांडुरंग चौरे यांच्या फिर्यादीवरून प्रताप दातार, नरसिंग दातार व त्यांचे दोन साथीदाराविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत.