केज दि.३ – २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका संस्था चालकाचे एका जीपमधून अपहरण केले. मात्र तीन दिवसाने अपहरणकर्ते लघुशंकेसाठी जीपमधून उतरल्यानंतर अंधाराचा फायदा घेत संस्था चालकाने त्यांच्या तावडीतून पळ काढला. ही घटना केज तालुक्यातील केळगाव शिवारात घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील बेलगाव येथील संस्था चालक खंडेराव रघुनाथ चौरे ( वय ४६ ) हे ३० डिसेंबर रोजी बेलगावकडे येत असताना केळगाव शिवारातील एका विहिरीजवळ त्यांना अडविले. नरसिंग लिंबाजी दातार यांनी तू लय माजलास का असे म्हणत अनोळखी इसमांना याला धरा आणि घेऊन जा असे सांगितले. त्यावरून त्या इसमांनी खंडेराव चौरे यांचे एका पांढऱ्या रंगाच्या जिपमधून अपहरण केले. त्यानंतर प्रताप नरसिंग दातार व संग्राम नरसिंग दातार या दोघा भावांनी त्या इसमांच्या फोनवर फोन करून २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास तिकडेच मारून टाका. असे सांगितले. एका कापसाच्या शेतात डोळे आणि हातपाय बांधून दोन दिवस एका कापसाच्या शेतात ठेवले. तेथून दुसरीकडे घेऊन जात असताना वाटेत अपहरणकर्ते हे जीपमधून लघुशंकेसाठी उतरल्याची संधी साधून खंडेराव चौरे यांनी अंधाराचा फायदा घेत शेतातून पळ काढला. त्यानंतर चुलत भावाला बोलावून घेऊन पोलीस ठाणे गाठले. खंडेराव चौरे यांच्या फिर्यादीवरून प्रताप दातार, संग्राम दातार, नरसिंग दातार ( सर्व रा. बेलगाव ) व इतर तीन इसमाविरुद्ध केज पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दादासाहेब सिद्धे हे पुढील तपास करीत आहे.
दरम्यान, संस्था चालक खंडेराव चौरे यांचे वडिल रघुनाथ चौरे यांनी दोन दिवसांपूर्वी आपला मुलगा बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसात केली होती.