Site icon सक्रिय न्यूज

चुलत्याच्या मृत्यू प्रकरणी पुतण्यावर खुनाचा गुन्हा दाखल…..!

बीड दि.5 – वडिलांना खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या पुतण्याने चुलत्याच्या डोक्यात, हातावर कत्तीने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चुलत्याचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. ही थरारक घटना सोमवारी (दि.०४) सायंकाळी अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे घडली. पुतण्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
               जनार्दन मुंजाजी धोंगडे (वय ५५, रा. घाटनांदूर, ता. अंबाजोगाई) असे मयत चलत्याचे नाव आहे. जनार्दन धोंगडे हे आठवडी बाजारात जाऊन चप्पल, बूट विक्रीचा छोटा व्यवसाय करून गुजराण करत. रविवारी (दि.०३) दुपारी ४ वाजता त्यांचा पुतण्या अर्जुन उर्फ दादा दत्तात्रय धोंगडे (वय २८) हा त्यांच्याकडे आला आणि माझ्या वडिलांना खर्चासाठी पैसे द्या म्हणू लागला. जनार्दन यांनी नकार देताच रागात येऊन बडबड करत निघून गेला.
         दरम्यान दुसऱ्या दिवशी (दि.०४) सकाळी जनार्दन हे व्यवसायासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी गंगाखेडला गेले. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ते गावात परतले आणि घराकडे निघाले. ते घरासमोर येताच अर्जून आदल्या दिवशी पैसे न दिल्याच्या रागातून त्यांच्या डोक्यात, हातावर आणि इतरत्र वार करू लागला. चुलता खाली रक्ताच्या थारोळ्यात पडला तरी अर्जुनने वार करणे थांबविले नाही. जनार्दन यांची मुलगी वैशाली वडिलांना वाचविण्यासाठी आरडाओरडा करू लागली तर अर्जुन तिच्यावर आणि इतर लोकांवर धावून जावू लागला. अखेर जमाव वाढल्यानंतर अर्जुन तिथून निघून गेला. वैशालीने इतर लोकाच्या मदतीने रक्तबंबाळ झालेल्या वडिलांना रिक्षातून अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात आणले. तिथे थोड्याच वेळात उपचार सुरु असताना जनार्दन यांचा मृत्यू झाला असे मुलगी वैशाली बापूराव वाघमारे हिने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.
           सदर फिर्यादी वरून अर्जून दत्तात्रय धोंगडे याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी बिक्कड यांनी प्रसंगावधान राखत तातडीने अर्जूनला ताब्यात घेतले आहे.
शेअर करा
Exit mobile version