औरंगाबाद दि.१७ – समाधान नेमके पद, पैसा अन प्रतिष्ठेत आहे की पाय जमिनीवर ठेवण्यात आहे हे समजले तर जीवन सुखकर होतं. आपण कुठल्या पदावर आहोत यापेक्षा आपण कोण आहोत हे लक्षात ठेवले तर लहान लहान गोष्ठीतही आनंद मिळतो. आणि असाच कांहीसा साधेपणाचा प्रकार समोर आला आहे. यातूनच सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत अन त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाले आहेत.
या फोटोत केंद्रेकर आठवडी बाजारात जाऊन स्वतः बाजार करताना दिसत आहेत. इतकंच नाही जर खरेदी केल्यानंतर पिशवी खांद्यावर घेऊन ते निघाले.आठवडी बाजारात पत्नीसोबत बाजार करतानाचे त्यांचे फोटो समोर आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील बाजारातील हे फोटो आहे.
सुनील केंद्रेकर हे औरंगाबादचे विभागीय आयुक्त आहेत. शेतकरी कुटुंबातील केंद्रेकर हे नेहमी आपल्या कडक शिस्तीच्या आणि सामान्यांसाठी निर्णय घेणारे अधिकारी म्हणून परिचित आहेत. दरम्यान मागच्या कांही दिवसांपूर्वी ते बीडचे जिल्हाधिकारी असताना बीडकरांच्या गळ्यातील ताईत बनले होते.