धुळे दि.१७ – भक्ती आणि श्रद्धेला जात, धर्म अन पंथ अडथळे ठरू शकत नाहीत. सबका मालिक एक अशी भावना घेऊन जीवनाकडे पाहणारे आणि सर्व धर्म समभाव जोपासणारे संवेदनशील व्यक्ती जगाच्या पाठीवर केवळ भारतातच दिसून येतात. आणि याचे ज्वलंत उदाहरण समोर आले आहे.
धुळ्यातील मुस्लिम समाजातील शेतकरी सांडू सुमन पिंजारी यांनी स्व:कष्टातून जमवलेल्या पैशातून महादेवाचं मंदिर उभारलं आहे.बिलाडी येथे दहा ते बारा मुस्लिम कुटुंबांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी राहणारे सांडू सुमन पिंजारी हे मुस्लिम समाजातील असून ते शेती करतात.
सांडू पिंजारी यांची भगवान महादेवावर नितांत श्रद्धा आहे. या श्रद्धेतून त्यांनी स्वत:च्या शेतात महादेवाचे मंदिर उभारण्याचा संकल्प केला. त्यांनी पाच वर्षांपूर्वी शेतात मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. पिंजारी यांनी गावातील कुणाकडूनही एक रुपया देणगी घेतली नसून या मंदिरात त्यांनी महादेवाची पिंड, नंदी आणि पार्वतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे.