मुंबई दि.२० – लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल दिली. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. मनसेसह विविध पक्षांनी आंदोलने केली त्याचा कांहीच परिणाम ऊर्जा खात्यावर झाला नाही. मात्र ग्रामपंचायत निवडणुका पार पडताक्षणी ‘महावितरण’ने थकीत वीजबिल वसुलीचे आदेश जाहीर करत चांगलाच शॉक दिला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान ज्यांच्याकडे वीज बिल थकीत आहे त्यांच्या घरी जाऊन बिल वसूल करा नसता वीज कापा असे सक्त आदेश ऊर्जा मंत्रालयाने क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
सर्वसामान्यांचे वीज कनेक्शन त्वरीत खंडित करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय म्हणजे नवी गाथा असल्याचं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.माझं घर माझी सुरक्षा, माझे वीजबिल मलाच झटका, मंत्र्यांना गाड्या कंत्राटदारांना मलई आणि बिल्डरांना सवलती, गोरगरीब मागती दिलासा तर त्यांच्या नशिबी मात्र आश्वासनाचा धत्तुरा, असं म्हणत उपाध्येंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मुळात अव्वाच्या सव्वा वीज बिल आली त्यात सवलती देण्याच्या घोषणा झाल्या पण बिल्डर, कंत्राटदारांसाठी तातडीने काम करणाऱ्या राज्य सरकारने सामान्यांच्या तोंडी पाने पुसली असल्याचंही उपाध्येंनी म्हटलं आहे.
तर मनसेचे संतोष धुरी यांनी यावर प्रतिक्रिया देताना जे वीज बिल वसुलीला आणि वीज तोडण्यासाठी येतील त्यांच्याशी दोन हात करण्याचे आदेश मनसेच्या वतीने देण्यात आले असल्याचा इशारा दिला आहे. तसेच ज्या 55% लोकांना हे सरकार चांगले वाटते तेच वीज बिल भरतील असेही धुरी यांनी म्हटले आहे.