अंबाजोगाई दि.२० – शहराचे विद्रुपीकरण होऊ नये, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये तसेच एखादा अपघात होऊ नये म्हणून शहरातील मुख्य भागात आणि वर्दळीचा ठिकाणी मोठमोठे फ्लेक्स लावण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. मात्र स्वस्तात मस्त प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासातून शहरात जागोजागी बॅनर दिसून येतात.आणि यालाच कंटाळून अंबाजोगाई शहरातील कांही नागरिकांनी गांधीगिरी चा मार्ग अवलंबत चक्क कुत्र्याला शुभेच्छा देणारे बॅनर लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शहराचे सौंदर्य अबाधित ठेवण्याचे काम स्थानिक प्रशासनाचे असते. मात्र नियम असतानाही ते धाब्यावर बसवण्याचे काम पद्धतशीरपणे केल्याचे दिसून येते. कमी पैशात जास्त प्रसिद्धी करून घेणारे अनेक महाभाग अगदी दर्शनी भागात आणि वर्दळीचा भागात जागा शोधतात आणि एकाच बॅनर वर शेकडो फोटो छापून स्वतःचेच पैसे खर्चून विकतच्या शुभेच्छा मिळवण्याचा प्रयत्न करतात.तर कुणी केवळ चमकोगिरी करण्यासाठी मोक्याच्या जागा भरून काढतात. यामधून वाहतुकीची कोंडी झालेली आणि अपघात झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र सामान्य नागरिकांना कितीही तक्रारी केल्या विनंती केली तरी प्रशासन ऍक्शन मोड मध्ये येताना दिसत नाही. आणि हे कुठल्या एकाच ठिकाणचे चित्र नाहीतर सर्वत्र हीच बोंब आहे. मात्र सांस्कृतिक वारसा असलेल्या अंबाजोगाई शहरात लोक जागरूक आहेत. ते जास्त दिवस असे प्रकार खपवून घेत नाहीत, आणि त्याचाच प्रत्यय आलेला आहे.
त्याचे झाले असे की, बॅनरबाजीला कंटाळलेल्या अंबाजोगाईतील नागरिकांनी चक्क कुत्र्याला शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. सदर बाजार चौकात दवाखान्याकडे जाणाऱ्या रोडवर लावलेले हे बॅनर चर्चेचा विषय झाले आहे. आतातरी प्रशासनाला जाग येईल आणि शहर बॅनरमुक्त होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.