अंबाजोगाई दि.२१ – मागच्या दोन दिवसांपासून अंबाजोगाई शहरात कांही तरुणांनी लावलेल्या व्हिडिओ ची चर्चा राज्यभर व्हायरल झाली होती. बॅनर बाजीला कंटाळून बॅनर लावले की खरोखरच कुत्र्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनर लावले होते याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. मात्र खरोखरच सदरील तरुणांनी त्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करून श्वान प्रेम व्यक्त केले आहे.
स्वस्तात मस्त प्रसिद्धीसाठी बॅनर बाजीचा धुमाकूळ झाला आहे. मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी बॅनर लावल्या जात असल्याने वाहतुकीच्या कोंडीसह अपघातही होत आहेत. मात्र स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा तक्रारी होत असतात. आणि याच पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरात कुत्र्याच्या वाढदिवसाचे लावलेले बॅनर हे बॅनर बाजीला कंटाळून उपहासात्मक लावल्याची चर्चा सुरू झाली होती. अनेकांनी सदरील तरुणांना तुम्ही मुद्दाम असे बॅनर लावले असेही बोलल्या गेले. मात्र ज्यांनी ते बॅनर लावले होते त्या तरुणांनी खरोखरच त्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करून श्वान प्रेम व्यक्त केले व चर्चेला पूर्णविराम दिला.
शहरातील सदर बाजार भागात अनेक तरुणांनी एकत्र येत सदरील कुत्र्याला उचलून घेऊन डीजे च्या तालावर ठेका धरत प्रिय श्वानाला शुभेच्छा दिल्या. दरम्यान उद्देश कांही का असेना चर्चा तर झाली…….!