बीड दि.24 – बहुतांश लोक लिहिण्यासाठी उजव्या हाताचा वापर करतात, तर काही जण डाव्या हाताने लिहितात. मात्र दोन्ही हातांनी सफाईने लिहिता येण्याचे कौशल्य अंगी असणाऱ्या व्यक्ती तुरळक असतात. या कौशल्याला इंग्रजीमध्ये ‘अँबिडेक्सटेरिटी’ म्हटले जाते. मात्र ही क्षमता फारच कमी लोकांच्या अंगी असते. फक्त एक टक्का म्हणजेच शंभरातील एकाच व्यक्तीच्या अंगी हे कौशल्य असते, इतके हे अवघड आहे. मात्र हे साध्य करणारे विद्यार्थी आहेत अन तेही भारतातच.
मध्य प्रदेशातील सिंग्रौली या ठिकाणी असलेल्या ‘वीणा वादिनी’ या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दोन्ही हातांनी लिहिण्याचे प्रशिक्षण अगदी सुरुवातीपासूनच दिले जाते. या शाळेमध्ये एकूण तीनशे विद्यार्थी असून, हे सर्व विद्यार्थी दोन्ही हातांनी तितक्याच सफाईने लिहू शकतात. दोन्ही हातांनी लिहिण्याच्या प्रशिक्षणाची सुरुवात विद्याथी पहिलीत असल्यापासूनच सुरु होते. या विद्यार्थ्यांना तिसरीच्या वर्गामध्ये येईपर्यंत दोन्ही हातांनी लिहिण्याचे कौशल्य उत्तम प्रकारे अवगत होते.
दरम्यान भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना दोन्ही हातांनी लिहिण्याचे कौशल्य अवगत होते, आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेत या शाळेमध्ये हे प्रशिक्षण मुलांना देण्यात येत असल्याचे ‘वीणा वादिनी’चे संस्थापक सांगतात. हे कौशल्य मुलांना अवगत असल्यामुळे तीन तासांची प्रश्नपत्रिका मुले अवघ्या दीड तासामध्ये सोडवू शकत असल्याचेही शाळेचे संस्थापक सांगतात.