बीड दि.२५ – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या आरोपांमुळे चर्चेत होते. बलात्कारासारखा गंभीर आरोप आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी दिलेली संबंधांची कबुली यामुळे भाजपा नेत्यांकडून मुंडेंवर निशाणा साधत वारंवार राजीनाम्याची मागणी केली जात होती. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पोलीस चौकशी पूर्ण होईपर्यत वाट पाहण्याची भूमिका घेतली होती. त्यातच महिलेने तक्रार मागे घेतली असल्याने धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला असून विरोधकही शांत झाले आहेत. मात्र एकीकडे भाजपा नेते टीका करत असताना पंकजा मुंडे यांनी या मुद्द्यावर मौन बाळगलं होतं. पण अखेर त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी करु शकत नाही. पण कोणत्याही अशा गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला आणि ज्यांचा काही दोष नाही अशा कुटुंबातील लहान मुलांना त्रास होऊ शकतो”.
“मी महिला बालकल्याण मंत्री राहिली आहे. एक नातं आणि महिला म्हणून याकडे मी संवेदनशीलतेने पाहते. हा विषय कोणाचा जरी असता तरी मी त्याचं राजकीय भांडवलं केलं नसतं, आजही करणार नाही. संवेदनशीलता दाखवून मीडियाने त्यांच्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. भविष्यात यासंबंधी निकाल लागेलच,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.