Site icon सक्रिय न्यूज

अंध महिलेच्या जीवनात एक दिवसाचा प्रकाश..…..! थेट पोलीस आयुक्त पदावर विराजमान……!

पिंपरी चिंचवड दि.27 –  सिने सृष्टीमध्ये एक दिवसाचा मुख्यमंत्री झालेला नायक चित्रपट आपण सर्वांनी पाहिला असेलच. अभिनेता अनिल कपूर हा नायक या चित्रपटामध्ये एक दिवसासाठी राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्याचप्रमाणे एक दिवसाचा  पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त बनण्याचं स्वप्न अंध, विधवा आणि झोपडपट्टी मधील युवकांचं पूर्ण झाले आहे. प्रजासत्ताकदिनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात हा सन्मान त्यांना मिळाला.

पिंपरी-चिंचवडमध्ये अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रजासत्ताकदिनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चक्क आपल्या पदाचा कार्यभार हा एका अंध महिलेला दिला. तर सहपोलीस आयुक्तपदी विधवा महिला आणि पोलीस उपायुक्त होण्याचा मान हा झोपडपट्टी मधील एका विद्यार्थ्यांला दिला. यामध्ये पोलीस आयुक्त पदी दृष्टीहीन रीना पाटील, सहपोलीस आयुक्तपदी विधवा महिला ज्योती पाटील, तर दिव्यांशु तामचीकर हा विद्यार्थी पोलीस उपायुक्त गुन्हे या पदावर नियुक्त झाले होते.

दरम्यान या सर्वाचा बडदास्त ही खऱ्याखुऱ्या पोलिसांप्रमाणे ठेवण्यात आली. ज्या पद्धतीने पोलीस आयुक्त कार्यलयात येत असतात, त्यावेळी त्यांना सॅल्युट केलं जातं. त्याच पद्धतीने या एक दिवसाच्या पोलीस आयुक्तांना सुद्धा देण्यात आलं. तर, पोलीस दलातील बँड पथकानेही सलामी दिली. त्यानंतर तिघेही कार्यालयात दाखल झाले, त्यावेळी त्यांना सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या स्थानी विराजमान करत कडक सॅल्युट ठोकून दैनंदिन कार्याला सुरवात केली. हा सर्व प्रकार पाहून हे तिघेही भारावून गेले. त्यांच्यासाठी हा क्षण आनंदाचा होता.

शेअर करा
Exit mobile version