Site icon सक्रिय न्यूज

जामिनावर सुटल्यानंतरही नाही सुधारला अन खा.अमोल कोल्हे यांच्या तक्रारीवरून पुन्हा अडकला…….!

जामिनावर सुटल्यानंतरही नाही सुधारला अन खा.अमोल कोल्हे यांच्या तक्रारीवरून पुन्हा अडकला…….!

पुणे दि.28 – खासदार अमोल कोल्हे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या भामट्याला पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. विशाल अरुण शेंडगे असं या भामट्याचे नाव आहे. त्याला मदत करणाऱ्या सुरेश बंडू कांबळे या त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे.

विशाल शेंडगे हा मागील काही महिन्यांपासून ‘मी चंद्रकांतदादा बोलतोय’ असं म्हणत पुणे आणि परिसरातील बांधकाम व्यवसायिकांना फोन करायचा आणि त्यांना पैशांसाठी धमकवायचा. ही बाब उघडकीस आल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.

विशाल शेंडगे याच्याविरुद्ध पुण्यातील कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये दोन, तर अलंकार पोलीस स्टेशनमध्ये एक असे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यातून जामीनावर सुटल्यानंतर आरोपीने पुन्हा एकदा खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाने बांधकाम व्यावसायिकांना फोन करुन पैशांची मागणी केली.

‘मी अमोल कोल्हे बोलतोय’ असं म्हणत वानवडी भागातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे त्याने पैशांची मागणी केली. याबाबत अमोल कोल्हे यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पुन्हा एकदा विशाल शेंगडेला अटक करण्यात आली आहे. तसेच, या भामट्याने आणखी कोणाच्या नावाने अशा प्रकारे खंडणी मागितली आहे का?, याचाही तपास पोलीस करत आहेत.

शेअर करा
Exit mobile version