Site icon सक्रिय न्यूज

सामाजिक न्याय विभागातही होणार मेगा भरती, ना.धनंजय मुंडे यांचे निर्देश……..!

सामाजिक न्याय विभागातही होणार मेगा भरती, ना.धनंजय मुंडे यांचे निर्देश……..!

मुंबई दि.२८ – सामाजिक न्याय विभागात वर्ग 3 ची 1441 आणि वर्ग ड ची 1584 पदे रिक्त असून पदभरती बाबत वित्त विभागाचे असलेले निर्बंध उठताच ही पदभरती करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

राज्यभरातील समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता या आंदोलनाची तात्काळ दखल घेत मंत्री धनंजय मुंडे यांनी आंदोलनापूर्वीच विविध कर्मचारी संघटना व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले. मुंडे यांनी अनेक मागण्यांबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले नियोजित लेखणीबंद आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे कळवले आहे.

मंत्रालयात आज झालेल्या या बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान पदोन्नतीबाबतही लवकर बैठक आयोजित करण्याबाबत तसेच विभागीय परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे निर्देशही यावेळी धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच शासकीय वसतीगृहात कंत्राटी पदे न भरण्याबाबत फेर आढावा घेऊन प्रस्ताव सादर करावा, शासकीय निवासी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करावी याबाबत यावेळी चर्चा झाली. आदिवासी उपयोजना अंतर्गत जो आकृतिबंध निश्चित केला आहे तसा आकृतिबंध अनुसूचित जाती उपयोजनेसाठी प्रस्तावित करून प्रस्ताव तात्काळ सादर करण्यात यावा; तसेच कंत्राटी जनसंपर्क अधिकारी विधी अधिकारी व संगणक चालक यांना सेवेत सामावून घेण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

बैठकीस संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष शांताराम शिंदे, कृती समिती अध्यक्ष राजेंद्र देवरे, उपाध्यक्ष राजेंद्र भुजाडे, कोषाध्यक्ष राजेंद्र कांबळे, सचिव सुजित भांबुरे, सचिव भरत राऊत, कार्यकारणी सदस्य भूषण शेळके, विठ्ठल राव धसाडे, प्रफुल्ल गोहते, डॉ. त्रिवेणी लोहार, शासकीय निवासी शाळा प्रतिनिधी विष्णू दराडे शिवराज गायकवाड हे उपस्थित होते.

शेअर करा
Exit mobile version