अंबाजोगाई दि.२९ – अनैतिक संबंधास नकार दिल्याच्या रागातून माय-लेकाने विवाहित महिलेचे अपहरण केले आणि निर्जन ठिकाणी नेऊन वस्त-्याने तिचे नाक कापून चेहरा विद्रुप केला. पाच वर्षापूर्वी घडलेल्या या गुन्ह्यात दोषी माय-लेकाला गुरुवारी (दि.२८) अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्या. एम.बी.पटवारी यांनी पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी घाट येथील रघुनाथ दतू फड हा अनैतिक संबंध ठेवण्यासाठी चार-पाच वर्षापासून सातत्याने पिडीतेवर जबरदस्ती करत होता. त्यांच्या धास्तीने पीडिता माहेरी निघून गेली होती. दि. ९ जानेवारी २०१६ रोजी पीडिता तिच्या मुलाला भेटण्यासाठी माहेरहून अंबाजोगाईला येत होती. यावेळी सेलमोहा पाटीवरून रघुनाथ फड आणि त्याची आई सत्यभामा दत्तू फड या दोघांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून धर्मापुरी येथील सबस्टेशन जवळच्या डोंगरातील झाडीत नेले. तिथे रघुनाथने वस्तऱ्याने पीडितेच्या नाकाचा शेंडा कापला आणि तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून रघुनाथ आणि सत्यभामा या दोघांवर परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक आर.एन. चाटे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्याची सुनावणी अंबाजोगाई विशेष जिल्हा व सत्र न्या. एम.बी. पटवारी यांच्या न्यायालयासमोर झाली. सरकार पक्षाकडून सात साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. पटवारी यांनी सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून रघुनाथ आणि सत्यभामा फड यांना दोषी ठरविले. पिडीतेच्या नाकाचा शेंडा कापून तिला विद्रुप केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपींना पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंड, अपहरण केल्यामुळे तीन वर्षे सक्तमजुरी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.