बीड दि.29 – मोबाईल वरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका मोबाईल दुकानदाराचा खून केल्या प्रकरणी एका आरोपीस आजन्म कारावास व अन्य दोघा आरोपींना दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायालय 4 थे बीड यांनी सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की, मयत रविंद्र मनोहर मदने, वय-20 वर्ष, रा. भवरवाडी, ता.वडवणी ह.मु.मैंदा शिवार यांच्याकडे इंडिगो कार असून ती गाडी तो स्वत: चालवत असे व भाड्याने देत असे. प्रकरणातील मयताची वडवणी येथे शिवमल्हार नावाची मोबाईल शॉपी असून सदरचा गुन्हा घडण्याच्या आगोदर अंदाजे दिड महिन्यापुर्वी यातील मयत व विधीसंघर्ष ग्रस्त आरोपी क्रमांक 2 यांच्यामध्ये मोबाईल देण्याघेण्याच्या कारणावरून आपसात भांडण झाले होते. सदर भांडणात आरोपी क्रमांक 1 दत्तात्रय अशोक जामकर, वय-23, रा मैंदा, ता.जि.बीड यास मयताने चापट मारून शिवीगाळ केली होती. तसेच विधीसंघर्ष ग्रस्त आरोपी क्रमांक 3 यासही मयताकडून दोन वर्षापुर्वी मारहान झाली होती. तिन्ही आरोपीतांनी झालेल्या मारहानीचा राग मनात धरून मयताचा खुन करण्याचा कट रचला व नगरला लग्नाला जायचे आहे म्हणुन मयताची इंडिगो कार भाड्याने करून मयताचा खून करण्याच्या उद्देशाने मयतास जामखेड ते आष्टी दरम्यान लघवीला जायचे आहे असे म्हणुन गाडी थांबवली. दरम्यान यातील आरोपी क्रमांक 1 याने त्याच्या जवळील मिरची पावडर मयताच्या डोळ्यात टाकली व मयताचा गुप्त भाग दाबून विधीसंघर्ष ग्रस्त आरोपी क्रमांक 2 व 3 याने मयताच्या गळ्यास दोरीचा फास टाकुन जोराने ओढून मयताचा गळा आवळून खुन केला. नंतर तिन्ही आरोपीतांनी मयताचे प्रेत परत बीड येथे आणुन बार्शी नाका रोड मार्गे इमामपूर रोड लगत कोल्हारवाडी शिवारात असलेल्या मुरमाच्या खड्यात पुरले व पुरावा नष्ठ केला.
सदरील प्रकरणात मयताच्या वडीलांच्या दाखल असलेल्या मिसींगवरून सपोनि गजानन जाधव यांनी प्रकरण उघडकीस आणले व सरकारतर्फे फिर्याद दिली. प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे यांनी करून आरोपीताविरूध्द सबळ पुरावा गोळा केला व अंतीम दोषोरापपत्र मा. न्यायालयास सादर केले.
आरोपीता विरुध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर आरोपी क्रमांक 1 यास कलम 302,364,120ब भादंवि अंतर्गत दोषी धरून आजन्म करावास व 45,000/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तर विधीसंघर्ष ग्रस्त आरोपी क्रमांक 2 व 3 यांनाही 302,364,120ब भादंवि अंतर्गत दोषी धरून दहा वर्ष सश्रम करावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नमुद प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील ए. डी. राख यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज सहाय्यक फौजदार बी. वाय. बोंबाळे यांनी पाहिले आहे.